आजकाल उच्चभ्रू लोकांमधे स्वतःची समाजसेवी संस्था (NGO) काढण्याचं खुळ माजलंय. कंपन्या आणि त्यांचे कामगार अश्या एखाद्या संस्थेमार्फत गरजूंना मदत करून आपले सामाजीक योगदान देत असतात. कंपनीजवळच्या एखाद्या झोपडपट्टीत औषधं, पुस्तकं किवा खाऊ वाटून समाजकार्य केल्याचं समाधान आणि प्रसिद्धी कंपन्या मिळवत असतात. काही हौशी मंडळी तिथल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात तर कधी त्यांना उद्योग धंदा करायला आर्थिक मदत करतात. हा सगळा प्रकार इतका फसवा आहे की ह्या समाजकार्यामुळेच समाजाचं जास्त नुकसान होतं.
झोपडपट्ट्या सार्वजनीक जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या असतात. त्यातील वीज आणि पाण्याची जोडणी अनधिकृत असते. एकगठ्ठा मतांसाठी येथील लोकांना शिधा वाटप पत्रिका देवून कालांतराने जमीनही त्यांच्या नावावर केली जाते. अश्या ठिकाणी फुकटात शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवून आपण झोपडपट्ट्यांना प्रोत्साहन देत असतो. मग गावाकडून लोकांचे लोंढे शहरावर आदळून शहरे बकाल झाल्यास आपणही जवाबदार नाही का?
आपण मिळकत कर भरून ‘कर स्वरुपात’ समाजासाठी आर्थिक योगदान देत असतो. प्रत्यक्षात सरकारी यंत्रणा आणि भ्रष्टाचार यापैकी ९०% रक्कम फस्त करतात आणि गरजूंना केवळ १०% लाभ पोचतात. समाजसेवा करतांना NGO’s सरकारची जवाबदारी स्वतःच्या अंगावर घेवून भ्रष्ट सरकारी यंत्रणेला सामाजीक जवाबदारीतून मुक्त करत असतात. कित्तेकदा NGO’s सुद्धा पैसे खाण्याची यंत्रणा म्हणून वापरल्या जातात. म्हणजे आपण पहिले सरकारला दिलेला ‘कर’ आणि नंतर NGO’s ला दिलेली देणगी मध्यस्थांच्या खिश्यात जातो आणि ‘गरिबी’ मात्र तशीच रहाते.
गेली कित्येक वर्षे कंपनीच्या Community Work मधे आलेल्या अनुभवावरून मी दोन गोष्टी शिकलो:
1. शक्यतो शेतकऱ्यांना/ ग्रामीण भागातील लोकांना मदत करावी. शहरात मदत वाटणारे खूप असतात पण दुर्गम भागात, प्रसिद्धी माध्यमांपासून दूर काम करणारे फार कमी असतात (काही चांगले उपक्रम:http://www.vkendra.org/, http://www.vayamindia.in).
2. आर्थिक मदत करायची असेल तर अश्या संस्थेला करावी जिकडे आपण स्वतः लाभार्थींशी बोलू शकतो. त्यामुळे आपली मदत खरोखर गरजूंपर्यंत पोचण्यात मदत होईल. अन्यथा CRY सारख्या संस्था गरजेपेक्षा जास्त मदत गोळा करत राहतील आणि आपला पैसा वाया जात राहील.
यापुढे तुमच्या कंपनीत कोणी अपंग/मतिमंदांच्या नावावर मेणबत्त्या/चॉकलेट विकायला आले तर त्यांच्या संस्थेची तपशीलवार चौकशी करा अन्यथा १०० रुपये घेवून तुम्हाला २० रुपयाचे चॉकलेट आणि ८० रुपयाचे खोटे समाधान विकण्यात येईल.
तुम्हाला अशी मदत करतांना काही बरेवाईट अनुभव आलेत?
1 comment:
खूप सुंदर आहे तुमचा विचार
Post a Comment