नुकताच पुण्यात घर घ्यायचा विचार मनात आला म्हणून बाजार भावाची थोडी चौकशी केली. सखोल अभ्यास केल्यावर लक्षात आलं की पुणं आता बंगरूळपेक्षा महाग झालं आहे. पुण्यात पगार बंगरूळपेक्षा कमी असतो आणि खर्च मात्र बंगरूळपेक्षा दुप्पट आहे.
उदा. पुण्यात आय.टी पार्क जवळ वाकड सारख्या अविकसित भागातही ४०००/चौरस फुट दराने घर घ्यावे लागते. तेच सर्जापूर रोड/ नागनाथपुरा ह्या भागात २५००/३००० भावाने घर मिळते. पुण्यात ४ खोल्यांच्या घराला बंगरूळपेक्षा १० ते १५ लाख रुपये जास्त पडतात. कुणाला पडताळून पहायचं असेल तर सुलेखा.कॉम, मकान.कॉम मधे वरील भागातील घरांच्या किमती बघता येतील.
बंगरूळमधे सर्व नवीन भाग बस मार्गांनी जोडलेले आहेत. तिथल्या ३० लाखाच्या फ्लॅटस्कीम मधे दोन मजली पार्किंग, प्रशस्त मैदान/बाग, जलतरण तलाव अश्या सोयी असतात. पुण्यात अश्या सोयींसाठी आणखी महाग फ्लॅटस्कीम शोधावी लागते. आणि एवढं करून पाणी आणि बससेवा वर्षनुवर्षे प्रलंबित रहाते. पाषण मधे बस सेवा अजून १० वर्षे तरी सुरु होणार नाही.
शिवाय कर्नाटकमधे बंगरूळ वगळता इतर ठिकाणी (मंगरूळ वैगरे) घरांच्या किमती आटोक्यात आहेत. पण महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, नागपूर अश्या सर्व गावांमध्ये जमीन आणि घरांच्या किमती गेल्या काही वर्षात गगनाला भिडल्या आहेत. ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे कर्नाटकात भू-माफिया आटोक्यात आहेत. तिथल्या नेत्यांनी फार थोडी जमीन हडपली आहे. तुलनेत, आपल्याकडे ह्या माफियांनी गावंच्या गावं खरेदी केली आहेत. पुण्यातच बघा ना, मगरपट्टा, नांदेड सिटी, अमनोरा, लवासा, पिरंगुट.....यादी मोठी आहे.
४०-५० लाखाचं घर घेवून अर्ध आयुष्य कर्ज फेडण्यात घालवायचं का हा प्रश्न आहे. कधी कशी खरंच इच्छा होते की पुणं सोडून बंगरूळला जावं. पण पुणं काही सुटत नाही L